उद्धव ठाकरे काय म्हणाले?
‘हेलिकॉप्टरमधील माझी बॅग तपासली त्याचे मला वाईट वाटले नाही. कारण, आम्ही कायद्याला मानणारे आहोत. ज्या प्रकारे माझी बॅग तपासली त्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, महायुतीचे नेते एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या बॅगा निवडणूक अधिकारी तपासणार आहेत का? जो कायदा माझ्यासाठी लावण्यात आला, तोच कायदा त्यांच्यासाठीही लावणार काय, हा माझा खरा प्रश्न आहे,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले. ठाकरे यांच्या सोमवारी वणी, दारव्हा आणि वाशीम येथे प्रचारसभा झाल्या. या तिन्ही प्रचारसभांत त्यांनी हा मुद्दा प्रकर्षाने मांडला.शिवसेना (उबाठा) आमदार, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनीही या प्रकारावरून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले. कायद सर्वांना समान हवा, महाराष्ट्रात येणाऱ्या दिल्लीश्वरांच्या आणि राज्याला लुटणाऱ्या नेत्यांच्या बॅगांचीही तपासणी व्हायला हवी, अशी मागणी आदित्य यांनी केली. ‘कोणतीही प्रक्रिया कायद्याने पार पडली पाहिजे. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून जो समानतेचा हक्क भारतीयांना दिला, तो सगळ्यांना लागू व्हायला हवा, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
‘फडणवीस यांचीही बॅग तपासली’
‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यात आले असताना, त्यांची बॅग तपासण्यात आली होती, ’ असे यवतमाळचे जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी सांगितले. ‘ ही नियमित प्रक्रिया आहे. प्रचारासाठी येणाऱ्या प्रत्येक राजकीय व्यक्तीची बॅग तपासली जाते. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ही तपासणी केली जात आहे. निवडणूक यंत्रणेची ती जबाबदारी आहे. अधिकारी त्यांची जबाबदारी पार पाडतात,’ असे वणीचे पोलिस निरीक्षक अनिल बेहरानी म्हणाले.
‘हे सूडाचे राजकारण’
‘माझीही गाडी काल तपासली. मला याचा आनंद आहे आणि उपस्थित अधिकाऱ्यांना याबाबत प्रोत्साहनही दिले. त्यांनी जरूर सर्व तपासणी करावी; परंतु, उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांची बॅग तपासणे हे सूडाचे राजकारण आहे,’ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. खासदार अमोल कोल्हे यांनीही विधानसभा निवडणुकीदरम्यान दुसऱ्यांदा आपल्या बॅगेची तपासणी झाल्याचा आरोप केला. हे नियम फक्त विरोधकांनाच आहेत का, असा प्रश्नही त्यांनी केला.
प्रकाश आंबेडकरांनी घेतली प्रशासनाची बाजू
‘बॅग तपासणी हा पोलिसांचा अधिकार आहे. या वादाचा मुद्दा करण्याची गरज नाही. निवडणूक काळात माझीही बॅग तपासली गेली होती. या दिवसांत हे होत असते,’ असे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी वाशीम येथे बोलताना सांगितले.