वॉशिंग्टन: रशियाच्या लष्करी-औद्योगिक तळांना मदत केल्याप्रकरणी अमेरिकेने जगभरातील २७५ व्यक्ती आणि घटक यांच्यावर निर्बंध लागू केले असून यामध्ये १५ भारतीय कंपन्या/घटकांचा समावेश आहे. रशियाला युद्धासाठी निकडीचे असलेले अद्ययावत तंत्रज्ञान आणि उपकरणे यांचा पुरवठा केल्याप्रकरणी चीन, स्वित्झर्लंड, थायलंड आणि तुर्की यांच्यावरही निर्बंध लादण्यात आले आहेत, अशी माहिती अमेरिकेच्या वित्त विभागाने गुरुवारी निवेदनाद्वारे दिली.अमेरिकेच्या वित्त विभागाने जारी केलेल्या यादीनुसार, भारतातील आभार टेक्नॉलॉजीज अँड सर्व्हिसेस प्रा. लि., डेनवास सर्व्र्सेस प्रा. लि., एमसिस्टेक, गॅलॅक्सी बेअरिंग्ज लि., ऑरबिट फिनट्रेड एलएलपी, इनोवियो व्हेंचर्स, केडीजी इंजिनीअरिंग प्रा. लि., खुशबू होनिंग प्रा. लि. या कंपन्यांचा समावेश आहे. त्याशिवाय, लोकेश मशीन्स लिमिटेड, पॉइंटर इलेक्ट्रॉनिक्स, आरआरजी इंजिनीअरिंग टेक्नॉलॉजीज प्रा. लि., शार्पलाइन ऑटोमेशन प्रा. लि., शौर्य एअरोनॉटिक्स प्रा. लि., श्रीजी इम्पेक्स प्रा. लि. आणि श्रेया लाइफ सायंसेस प्रा. लि. यांचाही निर्बंध घातलेल्या कंपन्यांच्या यादीत समावेश आहे.याआधी, बुधवारी अमेरिकेने ४०० व्यक्ती आणि घटकांवर रशियाच्या युक्रेनविरोधातील युद्धात मदत केल्याप्रकरणी निर्बंध घातले होते. जागतिक कर चोरीविरोधातील कारवाईत अडथळा आणणाऱ्या व्यक्ती व कंपन्या तसेच रशियाच्या लष्करी-औद्योगिक तळासाठी साहित्य आयात करणारे रशियन आयातदार आणि निर्माते यांचाही निर्बंध घातलेल्या घटकांमध्ये समावेश आहे.कारवाई सुरूच राहणारयुक्रेनविरोधातील बेकायदा आणि अनैतिक युद्धासाठी रशियाला आवश्यक असलेली महत्त्वाची उपकरणे आणि तंत्रज्ञान पुरवण्याला आळा घालण्यासाठी अमेरिका आणि आमचे जगभरातील मित्र देश निर्णायक कारवाई करत राहतील, असे अमेरिकेचे उप अर्थमंत्री वॅली अडेमो यांनी सांगितले.