मुंबई: विधानसभा निवडणुकीत महायुतीनं दमदार कामगिरी केल्यानंतर मुख्यमंत्रिपदावरुन पेच कायम आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री सर्वोच्च पदावर कायम राहण्यास उत्सुक आहेत. त्यासाठी त्यांनी वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला. पण सर्वाधिक जागा जिंकणारा मुख्यमंत्रिपदाचा त्याग पुन्हा एकदा करण्यास तयार नाही. बिहार पॅटर्न राबवून शिंदे यांनाच पुन्हा मुख्यमंत्रिपद देण्यात यावं, असा आग्रह शिवसेना नेत्याकडून धरला जात आहे. त्यानंतर आता शिंदेंच्या निकटवर्तीय नेत्यानं खळबळजनक दावा केला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर शिंदे यांनाच मुख्यमंत्री केलं जाईल, असा शब्द भाजपच्या वरिष्ठ पातळीवरुन देण्यात आला होता, असा दावा शिंदेंच्या जवळच्या नेत्यानं केला आहे.लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात झटका बसला. महायुतीला केवळ १७ जागांवर यश मिळालं. त्यानंतर भाजपकडून शिंदेंना मुख्यमंत्रिपदाचं आश्वासन देण्यात आलं होतं. महायुती पुन्हा सत्तेत आल्यास तुम्हालाच मुख्यमंत्रिपद देण्यात येईल, असा शब्द भाजपनं दिला होता, असा गौप्यस्फोट शिंदेंच्या निकटवर्तीय नेत्यानं केला. टाईम्स ऑफ इंडियानं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.’महायुतीचा लोकसभेत पराभव झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी बैठकांचं सत्र सुरु झालं. विधानसभेला भाजप सर्वाधिक जागा लढवेल. त्या खालोखाल जागा शिवसेना, राष्ट्रवादी लढेल. विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यास शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्यात येईल. मग त्यावेळी कोणाच्या किती जागा निवडून आल्या आहेत, याचा विचार केला जाणार नाही,’ असा दावा या नेत्यानं केला आहे.विधानसभा निवडणुकीत भाजपनं १३२ जागा जिंकल्या आहेत. तर शिंदेंच्या शिवसेनेला ५७ जागांवर यश मिळालं आहे. मुख्यमंत्रिपदाचा शब्द आधीच देण्यात आला होता, असा दावा करत शिवसेनेकडून करण्यात आल्यानं २०१९ मधील घडामोडींची पुनरावृत्ती होताना दिसत आहे. भाजपनं मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता. अमित शहांनी मातोश्रीवर येऊन बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत याबद्दलचं आश्वासन दिलं होतं, असं त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर आता शिंदेंची शिवसेनादेखील तसाच दावा करताना दिसत आहे.