ylliX - Online Advertising Network
कुठल्याही पदाची लालसा नव्हती, ठाकरे मात्र मुख्यमंत्रिपदासाठी गल्ली ते दिल्ली फिरले, एकनाथ शिंदेंचा प्रहार

कुठल्याही पदाची लालसा नव्हती, ठाकरे मात्र मुख्यमंत्रिपदासाठी गल्ली ते दिल्ली फिरले, एकनाथ शिंदेंचा प्रहार



संजय व्हनमाने, मुंबई : ‘महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात मोलाचे योगदान देता आले हे मी माझे भाग्य समजतो. मुख्यमंत्रिपदाच्या काळाचे हे संचित आहे, असे मी मानतो. मला कधीही कुठल्याही पदाची लालसा नव्हती. भविष्यात संधी मिळेल त्या माध्यमातून लोकांची सेवा करत राहीन हे निश्चित’, अशी भूमिका मुख्यमंत्री यांनी रविवारी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत मांडली.

शिवसेनेतून बाहेर पडताना नेमकी काय भावना होती?

खरे पाहायला गेले तर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले, त्यांच्या विचारांशी बेईमानी केली. जनतेसोबत विश्चासघात केला. शिवसेना-भाजप युती म्हणून आम्ही २०१९ची विधानसभा निवडणूक लढवली. एकीकडे बाळासाहेब ठाकरे, तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी अशी छायाचित्रे वापरून आम्ही निवडणूक लढवली आणि मते मागितली. त्यामुळे शिवसेना-भाजप युतीचे सरकार येणे अपेक्षित असताना शिवसेनेच्या नेतृत्वाने दुदैर्वाने अनैसर्गिक युती केली. बाळासाहेबांनी नेहमी ज्या काँग्रेसला बाजूला ठेवले, ज्यांच्याविरोधात लढलो, त्या काँग्रेसबरोबर घरोबा करीत हे त्यांच्या मांडीवर बसले आणि मुख्यमंत्री झाले. यात त्यांनी काय मिळवेल ? शिवसेना आणि धनुष्यबाण काँग्रेसच्या दावणीला बांधले. यात आमदारांची ससेहोलपट, शिवसेनेचे खच्चीकरण झाले. हे मी उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नव्हतो आणि म्हणून या एकनाथ शिंदेने उठाव केला. लोक सत्तेच्या दिशेने जातात, पण आम्ही सत्ता सोडून गेलो

मुख्यमंत्रिपदाचा विषय सध्या राज्यात जोरदार चर्चिला जात आहे, त्याविषयी काय सांगाल ?

महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी माझा चेहरा करा, माझा चेहरा करा, मला मुख्यमंत्री करा, असे ते दिल्ली ते गल्लीपर्यंत फिरले, मात्र महाविकास आघाडीमध्ये काही एकमत झाले नाही. आमच्या महायुतीमध्ये मात्र नेमकी उलट परिस्थिती आहे. आमच्यात कोणतीही स्पर्धा नाही. मी एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे. कष्टकऱ्यांच्या समस्या, त्यांचे अपार कष्ट या सगळ्यांची मला जाणीव आहे. माझे पाय जमिनीवर आहेत आणि कायम राहतील. मला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिल्यानंतर आम्ही गेल्या सव्वादोन वर्षांत विकास आणि लोककल्याणाचा समतोल साधला. आम्हाला काय मिळाले यापेक्षा महाराष्ट्रातील जनतेला काय मिळाले याकडे आमचे लक्ष आहे. त्यांच्या जिवनामध्ये सुखाचे, समाधानाचे आणि आनंदाचे दिवस कसे आणता येतील, तसेच या राज्याचा सर्वांगीण विकास करता येईल, विकासाचे विकेंद्रीकरण कसे होईल हाच आमचा अजेंडा होता. त्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला. केंद्रातील नेतृत्वाकडून मिळालेली भक्कम ताकद, यांची साथ तसेच लोकांच्या विश्वासाचे पाठबळ आणि लाखो बहिणींची माया याच्या आधारावर आम्ही राज्याला प्रगतीच्या मार्गावर आणले. राज्यात मी शेतकऱ्यांसाठी, कष्टकरी वर्गासाठी, तरुणांसाठी आणि विशेषतः माझ्या लाडक्या बहिणींसाठी जे काही धाडसी निर्णय घेतले ते केवळ नरेंद्र मोदी आणि अमितशहा या माझ्या दोन्ही नेत्यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे.मुख्यमंत्री म्हणून काम करताना मला जी काही ताकद त्यांनी दिली यासाठी मी आयुष्यभर त्यांचा ऋणी राहीन. गेल्या दोन वर्षांत मी गोरगरिबांची, सर्वसामान्यांची सेवा करू शकलो. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात मोलाचे योगदान देता आले हे मी माझे भाग्य समजतो. मुख्यमंत्रिपदाच्या काळाचे हे संचित आहे, असे मी मानतो. मला कधीही कुठल्याही पदाची लालसा नव्हती. भविष्यात संधी मिळेल त्या माध्यमातून लोकांची सेवा करत राहीन हे निश्चित. २३ तारखेनंतर महायुतीचे नेते एकत्र बसून मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय घेतील. तूर्त महाराष्ट्रविरोधी आणि विकासविरोधी आघाडीचा पराभव करणे आणि राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आणणे हेच आमचे लक्ष्य आहे आणि त्यानुसार आम्ही बहुमताचे सरकार आणणार.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *